Solapur police
सोलापूर : सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बाधित सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अधिकृत कारण शोधण्यासाठी संबंधित विभाग कार्यरत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, काल सायंकाळच्या सत्रात अनेक प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवला. त्यानंतर एकामागून एक प्रशिक्षणार्थी आजारी पडत गेल्याने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. १७ जणांवर विशेष उपचार सुरू आहेत, तर उर्वरितांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या जवळपास १,४०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यापैकी मोठ्या संख्येने बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.