सोलापूर - पुणे रस्त्यावर दारूच्या नशेत एका लक्झरी बसला अडवून चालकाशी वाद घालणाऱ्या टवाळखोर तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला. त्यामुळे घाबरलेल्या परराज्यातील प्रवाशांना आणि चालकाला मोठा दिलासा मिळाला.
बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पुणे महामार्गावरून एक परराज्यातील लक्झरी बस प्रवाशांना घेऊन जात होती. त्याच वेळी रात्री उशिरापर्यंत पार्टी करून मद्यप्राशन केलेले काही टवाळखोर तरुण कारमधून परतत होते. या तरुणांची लक्झरी बसचालकासोबत वादावादी झाली. नशेत असलेल्या या तरुणांनी थेट रस्त्यात लक्झरी बस अडवून चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पहाटेच्या अंधारात अचानक बस अडवल्यामुळे आत बसलेले प्रवासी आणि चालक प्रचंड घाबरून गेले.
बसवर दरोडा किंवा लुटालूट होण्याची भीती निर्माण झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधून सोलापूर शहर पोलिसांकडे मदत मागितली. घटनेचा कॉल मिळताच परिसरातील बीट मार्शलचे पोलिस कर्मचारी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.
त्याच वेळी शहरात रात्रकालीन गस्तीवर असलेले शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कोणताही वेळ न घालवता पहाटे पाच वाजता थेट घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसी खाक्या दाखवताच उतरली नशा !
चालक आणि प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या त्या मद्यधुंद तरुणांची प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. रस्त्यावर गैरवर्तन करून सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या टवाळखोरांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांची नशा क्षणात उतरली आणि त्यांनी आपली चूक कबूल केली.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस रात्रंदिवस गस्त घालत असतात; मात्र पहाटेच्या वेळी अशा प्रकारे संकटग्रस्त प्रवाशांना वेळेत मदत करून सुरक्षितता मिळवून दिल्याने एका वेगळ्या कर्तव्याचे समाधान मिळाले.- अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा