वाटंबरे : अनकढाळ टोल नाका येथे नाझरे, बलवडी, वझरे, चिणके, राजुरी, चोपडी, उदनवाडी, माडगूळ, या गावातून सांगली, कोल्हापूर, मिरज, पंढरपूर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर याठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची चढ-उतार असते. त्यामुळे अनकढाळ टोल नाका याठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. परंतु याठिकाणी पत्रा निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना एस.टी. बस मिळवण्यासाठी रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
टोल नाका याठिकाणचा पत्रा निवारा शेड हा सर्व्हिस रोड वरती उभा केल्याने याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे. परंतु, सर्व एसटी बसेस उड्डाण पुलावरून जात असल्यामुळे या पत्रा निवाराशेडचा प्रवाशांना कोणताही उपयोग होत नाही. उन्हात, पावसात, वार्यात प्रवाशांना रस्त्यावर ताटकळ एसटी बसची वाट पाहवी लागते. स्थानिक प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी तातडीने प्रवाशासाठी पत्रा निवारा शेडची सोय करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.