हवालदार यशवंत बाबर (Pudhari Photo)
सोलापूर

Solapur Soldier Death | पानीव गावाचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांचे कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Solapur News | बुधवारी सकाळी १० वाजता लष्करी इतमामात पानीव येथे अंत्यसंस्कार होणार

पुढारी वृत्तसेवा

Soldier Yashwant Babar Dies on Duty Kochi Kerala

पानीव : पानीव गावाचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील हवालदार यशवंत भानुदास बाबर (वय ५५) यांचे रविवारी (दि. २०) मध्यरात्री १ वाजता कोची (केरळ) येथे कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पानीव गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले यशवंत बाबर सध्या कोची येथील संरक्षण सुरक्षा दलात कार्यरत होते. देशसेवेच्या पवित्र कार्यात तन-मनाने समर्पित राहून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या जाण्याने गावाने एक शूर, निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सैनिक गमावला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. बाबर कुटुंबावर या दुःखद घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मंगळवारी सकाळी कोची येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयात त्यांना लष्करी मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचेल. त्यानंतर लष्करी वाहनाने पानीव गावात मध्यरात्रीपर्यंत आणले जाईल. बुधवारी (दि.२३) सकाळी १० वाजता लष्करी इतमामात पानीव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती प्रकाश पाटील यांनी दिली.

हवालदार यशवंत बाबर यांच्या अतुलनीय सेवेबद्दल संपूर्ण गावकऱ्यांना अभिमान आहे. त्यांचा हा मृत्यू सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक आहे.

वीर जवान यशवंत बाबर यांची लष्करातील सेवा 

  • जम्मू व काश्मीर : सलग १५ वर्षे देशाच्या संवेदनशील सीमेवर धैर्याने सेवा.

  • जैसलमेर (राजस्थान) : शुष्क सीमाभागात कर्तव्य बजावले.

  • पुणे (महाराष्ट्र) : प्रशिक्षण व प्रशासकीय जबाबदाऱ्या.

  • सिकंदराबाद (आंध्रप्रदेश) : दक्षिण भारतात सेवा.

  • जबलपूर (मध्यप्रदेश) : मध्य भारतात कर्तव्य.

  • केवळ दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बदली कोची (केरळ) येथे झाली होती, जिथे त्यांनी 1307 DSC PL OSS मध्ये सेवा बजावली.

  • विशेष म्हणजे, एका वर्षाने त्यांची लष्करातून सेवानिवृत्ती होणार होती. परंतु, त्याआधीच ड्युटीवर असताना त्यांना वीरमरण आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT