ज्वारी  
सोलापूर

Solapur Jowar Theft : बळीराजापुढे चोरट्यांचे संकट

पांगरी परिसरात ज्वारीची दीड लाखाची कणसे लंपास

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : तालुक्यातील पांगरी परिसरात शेतमालाच्या चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून आता तर चोरट्यांनी थेट काढणी करून ठेवलेल्या ज्वारीच्या कणसांवरच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पांगरी भागासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पांगरी-बार्शी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी नजीक खाटिक ओढ्याजवळ शेती असलेले सुरेश बळीराम धावणे यांच्या शेतात ही चोरी झाली. धावणे यांनी महिला मजूर लावून ज्वारीची कणसे मोडून शेतातच गोळा करून ठेवली होती. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी थेट वाहन शेतात लावून जवळपास 50 कट्टे भरतील एवढी ज्वारीची कणसे चोरून नेली.

या चोरीत शेतकरी सुरेश धावणे यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च, मजुरी आणि संपूर्ण हंगामाचे उत्पन्न एका रात्रीत लंपास झाल्याने धावणे कुटुंब हवालदिल झाले आहे. हातातोंडाशी आलेला घासच चोरट्यांनी हिरावून नेला, अशी भावना धावणे यांनी व्यक्त केली. पांगरी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून शेतातील पाईप, मोटारी, केबल्स यासोबतच आता थेट तयार पिकाच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्यावेळी वाहनांमधून येऊन शेतमाल लंपास केला जात असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर शेतात राखण करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी कांदे, सोयाबीनच्या गोण्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या, मात्र आता ज्वारीची कणसेच चोरून नेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या घटनेप्रकरणी धावणे यांनी पांगरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच शेत असल्याने रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.

बळीराजावरील संकटाची मालिका सुरुच

एकीकडे अवकाळी पाऊस, दुसरीकडे हमीभावाचा प्रश्न आणि त्यात आता चोऱ्यांचे संकट यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. प्रशासनाने या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT