सोलापूर

Solapur Onion Price Hike : बाजारात कांदा आवक वाढली; क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकेत मंगळवारी (दि.१३) वाढ झाली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकेत मंगळवारी (दि.१३) वाढ झाली. दिवसभरात २० हजार ५९८ क्विंटल कांद्याची आवक झाली. आवकेसोबतच कांद्याच्या दरातही किंचित सुधारणा झाली असून सरासरी दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ झाली आहे.

बाजार समितीत मंगळवारी कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५ हजार ५०० रुपये, तर किमान ५०० रुपये दर मिळाला. सरासरी दर २ हजार ८०० रुपये राहिला. सोमवारी कांद्याचा सरासरी दर २ हजार ६०० रुपये होता. त्यात मंगळवारी वाढ होऊन तो २ हजार ८०० रुपयांवर पोहोचला. त्यामुळे कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र बाजार समितीत पाहायला मिळाले.

आवक वाढल्यानंतरही सरासरी दरात सुधारणा झाल्याने कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण, कांद्याच्या क्वालिटीनुसार दरात मोठी तफावत कायम आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला पाच हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असताना, कमी प्रतीच्या कांद्याला मात्र माफक दर मिळत आहे.

पांढरा कांदा जातोय आंध्रा, कर्नाटकला

पांढऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळत आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून या कांद्याला मागणी असते. पिझ्झा तयार करण्यासाठी पांढऱ्या कांद्याचा जास्त वापर होत असल्याने त्याला चांगला भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कांदा ५० रुपये किलो

घाऊक बाजारात कांद्याच्या सरासरी दरात वाढ झाली असली, तरी शहरातील किरकोळ बाजारात कांद्याचे दर चढेच आहेत. सोलापूर शहरात सध्या कांद्याची विक्री प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दराने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT