सोलापूर

सोलापूर : दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही : आमदार बच्चू कडू

निलेश पोतदार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा दुष्काळ जारी करा हे नेहमीचेच रडगाणे झाले आहे. दुष्काळ जाहीर करा हे शब्द आता सर्वांच्या तोंडात रूळले आहेत. दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा शेतीच्या उत्पादन खर्च कमी करण्याचा सल्‍ला आ. बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांना दिला. तसेच दुष्काळ जाहीर करण्याची गरज नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

आ. बच्चू कडू हे आज (बुधवार) सोलापूर दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या सीईओ मनिषा आव्हाळे, प्रहार शहराध्यक्ष अतुल कुलकर्णी, जमीर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. बच्चू कडू म्हणाले, दुष्काळ जाहीर केल्यावर काहीही होत नाही. सरकारने शेतकर्‍यांना रास्त भाव दिले पाहिजे. अन्यथा शेतकर्‍यांनी आपल्या शेतात होणारा खर्च कमी करावा. शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात कंपन्याकडे जात आहे. सुरुवातीला शेतकरी हा शेतातील उत्पादन खर्च स्वतःच करित होता. मात्र आता उत्पादन घेताना खते, औषधे, मशागत आणि इतर कामांसाठी इतरांवर अवलंबून राहत असल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती परवडत नाही.

75 वर्षांपासून दिव्यांगाकडे दुर्लक्ष होत आहे. 15 ऑगस्ट पासून दिव्यांगाच्या दारी या उपक्रमांतून दिव्यांगासाठी विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करित आहे. दिव्यांगांना अजून 5 टक्के निधी नाही. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करित निधी देत आहे. राज्यातील सर्व दिव्यांगांना दिव्यांगाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम सुरु केला असून, प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवित असल्याचे यावेळी आ. बच्चू कडू यांनी सांगितले.

अडीच लाखाचं घर बांधून देऊ

निवृत्त कलावंत शातांबाई काळे यांना घर बांधून देण्याचा मागे शब्द दिला होता. मात्र त्यांनी दहा लाखांचे घर बांधून द्या, अशी मागणी केल्यामुळे घर बांधले नाही. त्यांना प्रहार संघटनेकडून अडीच लाखांचे घर बांधून देण्यात येईल, असे यावेळी आ. कडू यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT