पंढरपूर : पंढरपूर तालुक्याचा मोहोळ, माढा, सांगोला व पंढरपूर या चार विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघांत उमेदवारी देताना महाविकास आघाडी आणि महायुतीला देताना निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी द्यावी लागणार आहे.
कारण पंढरपूर तालुक्याचा प्रभाव हा चार विधानसभा मतदारसंघांवर पडणार आहे. त्यामुळे पंढरपूर आपल्या हातात ठेवण्यासाठी नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यातच अकलूजच्या मोहिते-पाटील यांचे या मतदारसंघावर वर्चस्व असल्यामुळे महाविकास आघाडी प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देऊन आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील २२ गावे व पंढरपूर शहर हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात येतात. पंढरपूर शहर व २२ गावांवर प्रशांत परिचारक यांची मजबूत पकड आहे. जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य हे परिचारक गटाचेच आहेत. त्याचबरोबर सहकारी संस्था, बैंक, साखर कारखाने याव्दारे मजबूत जाळे विणले आहे. त्यामुळे परिचारक यांच्या वर्चस्वाचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाड़ी प्रयत्नशील आहे.
शरद पवार यांनी प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. पंढरपूर तालुक्यातील १५ गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेली आहेत. या सांगोला विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आ. शहाजी पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला आहे.
तो शाबुत ठेवण्यासाठी स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू शरद पवार यांच्या मध्यस्थीने प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीतून सांगोलाची जागा ही शेकापला दिली जाणार आहे. त्यामुळे सांगोल्यात शेकाप विरोधात शिवसेना, अशी लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीत पंढरपूर तालुक्यातील १५ गावांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण ही १५ गावे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या विचारांची आहेत.
विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश आहे. माढचाचे अर्धे मतदार पंढरपूर तालुक्यातील आहेत. ऊसपट्टयातील ही गावे असल्याने माढा विधानसभेसाठी साखर कारखानदारांमध्येच लढत होत आहे. येथे पूर्वीचे शरद पवार गटाचे व सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे नेतृत्व करत आहेत.
शिंदे यांच्या नेतृत्वावर मतदार खूश आहेत, तर बहुतांश मतदार हे नाखूश आहेत. यातच राज्यात महाविकास आघाडीकडे असलेला मतदारांचा कल पाहता आ. शिंदे हे महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेण्यास धडपड करत आहेत; मात्र अजित पवार हेही जागा सोडतील, अशी सुतराम शक्यता नाही.
त्यामुळे बबनदादा शिंदे हेच माढ्याचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. माडामधूनच पंढरपूरचे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. अभिजित पाटील हे महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेण्यास उत्सुक आहेत. ४२ गावे पाटील यांच्या बाजूने कौल देण्याची शक्यता आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. या सतरा गावांच्या मतदानावरच मोहोळचा आमदार कोण, हे ठरणार आहे. त्यामुळे महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आ. यशवंत माने हेच उमेदवार असणार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीला सर्वसामान्य नेतृत्व करणारे राजू खरे यांच्या रूपाने उमेदवार मिळाला आहे. राजू खरे हे महाविकास आघाडीकडून 'तुतारी' वाजवायला तयार आहेत. येथे शरद पवार हे जातीय राजकारणाचा फायदा घेण्यासाठी राजू खरे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. या ठिकाणी माजी आ. रमेश कदम, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजित ढोबळे हेही शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत.