पिलीव : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील इरिगेशन चौकीनजीक इमर्जन्सी किंवा गरजेनुसार कालव्यातून पाणी सोडण्यासाठी एस्केप चावी आहे. या एस्केपमधून पावसाळ्यात तसेच गरज असेल तेव्हा उन्हाळ्यात ओढ्याला पाणी सोडले जात होते. मात्र, हा एस्केप तब्बल १६ वर्षांपासून जाम होऊन बंद झाला होता. अखेर जि. प. सदस्य चंद्रकांत जाधव यांनी पाण्याची गरज ओळखून यामधून पाणी सोडण्यास भाग पाडले. त्यामुळे झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली, शेंडेचिच या चार गावातील शेतीसाठी फायदा झाला आहे.
यंदा भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाळा संपत आला तरी पुरेसा पाऊस पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी जि. प. सदस्य चंद्रकांत जाधव यांच्याकडे नीरा उजवा कालव्यातून एस्केपमधून पाणी सोडण्याची मागणी केली होती. याबाबत चंद्रकांत जाधव व पं. स. सदस्य नम्रता पुकळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार रामभाऊ सातपुते, मा.खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला. तर माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक लावली. अखेर १६ वर्षांपासून बंद असलेला इरिगेशन चौकीवरील नीरा उजवा कालव्यावरील एस्केप उघडला गेला.
यामुळे झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली, शेंडेचिच या चार गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. चार गावातील पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. एस्केप उघडताना सचिन पडळकर, उमेश सरवदे, महादेव जाधव, बाळू जाधव, शशांक पाटील, शिवाजी जाधव, दादासाहेब मगर, दत्तात्रय जाधव, ज्ञानेश्वर ढेंबरे, श्रीपती जाधव, गणेश चिकणे, संभाजी ढेरे, मेजर जयशिव गलांडे, बाळासाहेब धायगुडे, संजय पाटील, शामराव गलांडे आदी उपस्थित होते.