दीपक शिराळकर
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग सहामध्ये मोकाट डुक्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. प्रामुख्याने देशमुख पाटील वस्ती, आमराई, गंगा नगर, हब्बू वस्ती आणि 54 मीटर रस्त्यावरील मुक्ताई मंदिर परिसरात या डुकरांनी उच्छाद मांडला आहे. हा परिसर झोपडपट्टी बहुल आहे. घरांच्या अगदी जवळ या डुकरांचा राबता असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ही डुकरे चक्क नागरिकांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळ आणि रात्रीच्या वेळी डुकरांच्या टोळ्या रस्त्यांवर ठाण मांडून बसतात, ज्यामुळे चिमुरड्यांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये आणि कचरा कुंडी परिसरात डुकरांचा वावर असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.स्थानिक रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या या सुस्त कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आमचा छळ कधी थांबणार? असा सवाल विचारत आहेत. महापालिकेने या मोकाट डुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली.