सोलापूर :आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील वीरशैव लिंगायत समाजाने ऐतिहासिक आणि एकमुखी भूमिका जाहीर करत, धर्माच्या रकान्यात हिंदू अशीच नोंद करण्याचा निर्धार व्यक्त केला. होय, आम्ही सारे हिंदूच नोंदविणार, असा ठाम संदेश समाज बांधवांनी दिला. या संदर्भात सोलापुरातील शिवस्मारक येथे आयोजित बैठकीत समाजातील विविध ज्ञाती संस्था, प्रतिष्ठित नागरिक, मठाधिपती, शिवाचार्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी जनगणनेत प्रत्येक वीरशैव लिंगायत नागरिकाने धर्माच्या रकान्यात हिंदू अशी नोंद करावी आणि पुढील रकान्यात आपली जात व पोटजात नमूद करावी, असा सर्वानुमते निर्णय यावेळी घेण्यात आला.बैठकीत समाजाच्या या भूमिकेला पाचही पीठांचे जगद्गुरू, विविध मठांचे मठाधिपती तसेच शिवाचार्य यांचा पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती देण्यात आली. समाजाची धार्मिक व सांस्कृतिक ओळख अबाधित ठेवण्यासाठी जनगणनेतील अचूक नोंदणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले.यावेळी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, प्रांत पालक हेमंतराव हरहरे, प्रा. गजानन धरणे, जनता बँकेचे संचालक महादेव न्हावकर, अण्णाराया बिरादार, गुरुराज चरंतिमठ, दानेश तुमशेट्टी आणि तेजस महाजन यांनी मार्गदर्शन केले. वीरशैव लिंगायत समाजाने संघटित राहून जनजागृती करावी आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत हा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य बैठकीसोबतच दिवसभर सोलापूर शहरात विविध स्तरांवर बैठका व संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले. डॉ. शैलेश पाटील यांच्या निवासस्थानीही या विषयावर चर्चा झाली. तसेच वीरशैव लिंगायत शिवशिंपी समाजाच्या बैठकीत सुमारे 60 समाज बांधवांच्या उपस्थितीत आगामी जनगणनेत हिंदू अशीच नोंद करण्याचा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला.
या सर्व बैठका आणि जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा संयोजक चिदानंद मुस्तारे, जिल्हा सहसंयोजक मनोज हिरेहब्बू, सतीश जरांकली, सुरेखा होळीकट्टी, अंबिका पाटील, शहर संयोजक सचिन विभुते, अजित पांढरे, सोशल मीडिया प्रमुख राहुल पावले आणि शहर सहसंयोजक सतीश तमशेट्टी यांनी परिश्रम घेतले.