सोलापूर : फिरायला गेलेल्या जोडप्यातील मुलावर चाकूने वार करुन सोन्याची साखळी लुटणाऱ्या दोन आरोपींना विजापूर नाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विजापूर नाका तसेच शहर गुन्हे शाखेचे पथक वीस दिवसांपासून परिश्रम घेत होते. आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास प्रथम नकार दिला होता परंतु पोलिसी खाक्या दाखवून तसेच कुशलतेने तपास करुन या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी लावला.
गेल्या महिन्यात 20 ऑक्टोंबर रोजी व्यंकटेश संजय बुधले हा तरुण मैत्रणीसोबत विजापूर रोडवर दुचाकीवरुन फिरायला गेला होता. हॉटेल आदित्यजवळ या दोघांना अडवून तीन जणांनी सोन्याची साखळी लुटली, तसेच योगेशवर चाकूने वार केले. या गुन्ह्यानंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली. तब्बल 22 दिवसानंतर या गुन्ह्याचा छडा लागला. तीन सराईत गुन्हेगारांनी हा गुन्हा केल्याचे विजापूर नाका पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले.
विकी दशरथ गायकवाड ( वय 25, रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी, सोलापूर) आणि विनोद उर्फ रावण शावरप्पा गायकवाड (वय 25, रा. होटगी, ता. द. सोलापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून जगदीश उर्फ बारक्या संगटे (रा. मोदी, सोलापूर) हा फरार आहे. लुटलेली सोन्याची साखळी, चाकू, मोटारसायकल असा एक लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड, सुशांत वरळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, अप्पा पवार, सचिन हार, गणेश शिर्के, अजय परदेशी, शंकर भिसे, लक्ष्मीकांत फुटाणे, सद्दाम आबादीराजे, संतोष माने, राहुल विटकर, समाधान मारकड, अमृत सुरवसे, संतोष चानकोटी, रमेश कोर्सेगाव, स्वप्निल जाधव यांनी पार पाडली.
फिर्यादींनी सांगिल्याप्रमाणे रेखाचित्र काढून आरोपींचा शोध घेण्यात आला. रेखाचित्राप्रमाणे असलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर बाळे येथून विकी गायकवाड याला अटक करण्यात आली. त्यानंतर विनोद उर्फ रावण याला ताब्यात घेण्यात आले. हे दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. विकी गायकवाड याच्यावर 11 तर विनोद गायकवाड याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. सुरवातीला आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी कुशलतेने तपास करुन त्यांच्याकडून गुन्हा उघडकीस आणला. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.