सोलापूर : शहराचा कारभार पाहणाऱ्या स्मार्ट महापालिकेचे कामकाज सोमवारी (दि.१) पुन्हा भोंग्यावर सुरू झाले आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या आदेशानुसार कार्यालयीन वेळेत चार वेळा हा भोंगा वाजविण्यात सुरुवात झाली आहे. वेळेत भोंगा वाजविण्याची जबाबदारी महापालिका कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडे आहे.
महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना कार्यालयीन वेळेची माहिती होण्यासाठी तसेच वेळेचे महत्व जाणण्याकरिता भोंगा सुरू करण्यासंदर्भात महापौर कोंड्याल यांनी आदेश दिले होते. याबाबत कार्यवाही करण्याची लेखी सूचना महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी यांना दिले.
त्यानंतर कौन्सिल हॉल सभागृहाखालील कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालयात या भोंग्याची यंत्रणा बसविण्यात आली. सोमवारी एक जूनपासून पुन्हा हा भोंगा सुरू करण्यात आला. नियमित वेळेत बटन दाबून हा भोंगा वाजवण्याची जबाबदारी महापालिका कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडील कर्मचारी अब्दुल रहेमान पटेल हे सांभाळत आहेत. महापालिकेच्या संपूर्ण आवारात हा आवाज घुमतो. या भोंग्याच्या वेळेवरच महापालिका कर्मचारी, अधिकारी कार्यरत असल्याचे दिसून येते.