सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोेपचार रुग्णालयासाठी अत्याधुनिक प्रणालीची बावीस कोटी रुपये किमतीची नवीन एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग) मशिन मंजूर झाली आहे. मानवी शरीराच्या आतील भागांतील तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी या मशिनचा वापर होतो. शक्तिशाली चुंबक, रेडिओ लहरी व संगणक वापरामुळे आजाराची स्थिती समजल्यावर त्याबाबतचे अचूक निदान होते. मशिन एक्स-रेचा वापर करीत नसल्याने ते सुरक्षित आहे. याचा फायदा हा शहर व जिल्ह्यातील गरीब रुग्णांना होणार आहे.
येथील शासकीय रुग्णालयात शहर व जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, कलबुर्गी, बिदर, विजापूर व तेलंगणासह अन्य जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच, येथून विजापूर, पुणे, हैदराबाद, धुळे, गुलबर्गा यासह अन्य महामार्गावर जर मोठा अपघात घडल्यास अशा वेळी जखमींचे एसआरआय करावी लागते. अशा वेळी जखमींना एमआरआय करण्यासाठी बाहेर पाठवावे लागते. सध्या येथे असलेले मशिन हे व्यवस्थित चालत नाही. म्हणून रुग्णालयाच्या प्रशासनाकडून नवीन मशिनची मागणी होती. त्यानुसार अत्याधुनिक प्रणालीची मशिन मंजूर झाली. यासाठी आर्थिक तरतूदही झाली आहे. मानवी शरीराचा एमआरआय करणे महागडा व खर्चीक असल्याने अनेक वेळेला गरीब रुग्ण ते करून घेत नाहीत. टाळतात. पर्यायाने रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाही. म्हणून तो आजार बळावतो. मग. काहीवेळेला मृत्यूही ओढावू शकतो.
मेंदू, पाठीचा कणा, सांधे, हृदय व पोटातील अवयवांसारख्या शरीराच्या अंतर्गत भागांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी याचा वापर होतो. कर्करोग, स्ट्रोक, अस्थिबंधन दुखापती आणि डीजनरेटिव्ह विकारांचे निदान आणि निरीक्षण करण्यासाठी डॉक्टर एमआरआयचा वापर करतात. याद्वारे रुग्णावर उपचार केले जाते.
अवयवांच्या तपशिलवार प्रतिमा तयार होतात
चुंबकीय क्षेत्र, मशिनच्या आत एक मोठे चुंबक असते, जे शरीरातील प्रोटॉनना एका विशिष्ट दिशेत संरेखित करते.
रेडिओ लहरी : रेडिओ लहरींच्या स्पंदनामुळे हे प्रोटॉन उत्तेजित होतात व त्यांच्या मूळ स्थितीपासून दूर जातात.
प्रतिमा निर्मिती : जेव्हा रेडिओ लहरी थांबतात, तेव्हा प्रोटॉन त्यांच्या मूळ स्थितीत परत येतात व या प्रक्रियेत उत्सर्जित होणार्या रेडिओ लहरी संगणकाद्वारे शरीराच्या आतील अवयवांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी वापरल्या जातात.
पुणेनंतर बावीस कोटी रुपये किमतीची एमआरआय मशिन ही फक्त येथेच मंजूर झाली आहे. येथील रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करून या मशिनची मागणी केली होेती. त्यानुसार ते मंजूर झाले आहे. ते कार्यान्वित झाल्यास त्याचा गरीब रुग्णांना फायदा होणार आहे व डॉक्टरांना अचूक निदान करता येईल.- डॉ. ऋत्विक जयकर, अधिष्ठाता, सिव्हिल रुग्णालय
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणार्या गरीब रुग्णांच्या तपासणीसाठी या नवीन अत्याधुनिक मशिनचा वापर होईल. रुग्णांच्या आजाराची स्थिती वेळीच कळल्यास त्याच्यावर अचूक उपचार होऊ शकतो. पैसेही वाचतील व रुग्णही वेळीच बरा होईल.- बाबा मिस्त्री, रुग्ण सेवक, सोलापूर