सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी गुरुवारपर्यंत (दि. 7) चिंचपूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचले. परंतु भीमा नदीकाठचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहे.
वीजेअभावी विद्युत मोटारी चालू होत नसल्याने पिकांना पाणी सोडण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली असून, वस्तीवरील जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उजनीतून पाणी सोडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र काढून महावितरणला कडक सूचना दिल्या आहेत. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि नदीकाठच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी शेतीपंपाचा उपसा रोखणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
त्यासाठी नदीकाठचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करावा. केवळ अत्यावश्यक कामांसाठी दिवसातून फक्त तीन तास वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशा सूचना दिल्या आहेत. तीन तासही पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
शेतकऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार
कडाक्याच्या उन्हामुळे नदीकाठची पिके आधीच जळून खाक होत आहेत. आता पाणी सोडल्यानंतर ते पिकांना मिळेल, अशी आशा असतानाच वीज कापली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी असूनही वीज नाही आणि वीज असली तर पाणी नाही, अशा विचित्र परिस्थितीत बळीराजा अडकला आहे.
हिळ्ळीपर्यंत पाणी पोहोचण्यास चार दिवस
उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटक सरकारने उमराणी-सादेपूर येथील बंधाऱ्यात अडविल्याने पाण्याचा प्रवाह संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे हिळ्ळीपर्यंत पाणी पोहोचण्यास आणखी चार दिवस लागण्याची शक्यता आहे. चिंचपूर, बरुर, आळगे, खानापूर असे चार बंधारा भरल्यानंतर ते पाणी हिळ्ळीकडे रवाना होणार आहे. भीमा नदीतील पाण्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.