सोलापूर : भीमा खोऱ्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढल्याने नद्यांना पूर आला आहे. लोणावळा, मावळ आणि भीमाशंकर भागातील पावसामुळे इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. या पुराचे पाणी थेट दौंडमध्ये जमा होत असल्याने उजनी धरणात येणाऱ्या आवकेमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे धरण बुधवारी मृतसाठ्यातून बाहेर पडून प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे.
सोमवारी रात्री १२ च्या सुमारास १ लाख ४ हजार ७०८ क्युसेक आवक झाली. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ही आवक एक लाख ५६ हजार १८७ इतकी होती. असाच विसर्ग येत राहिला, तर बुधवारी सकाळी साठा प्लसमध्ये येईल. दर तीन तासाला धरणात १ टक्क्याहून अधिक पाणी वाढत आहे.
भीमा खोऱ्यातील धरणांतून विसर्ग
मंगळवारी सकाळी आठच्या अपडेटनुसार, कळमोडी धरणातून ६ हजार ७६९ क्युसेक, वडिवळे धरणातून ६ हजार ६२० क्युसेक, कासारसाई धरणातून ४ हजार १९४ क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सुरू आहे.
नीरा खोऱ्यातही समाधानकारक पाऊस
नीरा खोऱ्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नीरा-देवघर धरणात सर्वाधिक १५२ मिमी पावसाची नोंद झाली. भाटघर, नीरा-देवघर, वीर आणि गुंजवणी या चार प्रमुख धरणांमध्ये एकूण ३.५६ टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली. या चारही धरणांचा एकूण साठा ११.३६ टीएमसी (२३.५१ टक्के) झाला. दरम्यान, वीर धरणातून नीरा उजव्या कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.