करमाळा : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी करमाळा पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील केम मंडल निरीक्षकांनी घेतलेल्या जबाबाची कागदपत्रे संशयित पोलिस विकास देवकर यांनी फाडली. यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विकास बाळू देवकर (रा. केम) यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी केमच्या मंडल अधिकारी मीरा गोरोबा नागटिळक (वय 41) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार 18 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पाथर्डी येथील गट नंबर 567 या ठिकाणी घडला.
पाथर्डी, मौजे केम गट नं. 567 मधून रस्त्यासाठी करमाळा तहसीलदारांकडे सुनावणी सुरू होती. त्यासाठी तहसीलदारांच्या आदेशाने सदर शेती गट नं. 567 च्या ठिकाणी मंडल अधिकारी म्हणून मीरा नागटिळक यांना प्राधिकृत केले होते. त्यानुसार नागटिळक यांनी गट न 567 मध्ये जाऊन वादी, प्रतिवादी यांना बोलावून घेतले. तेथे पंचासमक्ष स्थळ पाहणी पंचनामा करून 18 जून रोजी वादी-प्रतिवादी यांचे जबाब नोंदविले. ते जबाब त्यांच्या सांगण्याप्रमाणेच नोंदविले. त्यानंतर त्यांचे जबाब त्यांना वाचून दाखवल्यानंतर त्यावर संबंधितांनी स्वाक्षरी व अंगठा केला. त्या जबाबावर मंडल निरीक्षक नागटिळक यांनीही स्वाक्षरी केली.
दरम्यान, त्याच वेळी प्रतिवादी बाळू लिंबाजी देवकर यांचा मुलगा विकास बाळू देवकर हा पोलीस गणवेशात तेथे आला. त्याने त्याच्या वडिलांचा घेतलेला जबाब वाचण्यासाठी मागितला. तो जबाब त्यास दिल्यानंतर त्याने वाचून यामध्ये दोन शब्द राहिलेले आहेत असे म्हणाला. त्यावेळी तो जबाब मंडळ निरीक्षक नागटिळक यांनी स्वतःच्या हातात परत घेऊन सांगितले की हा जवाब आता पूर्ण झालेला आहे. तुमच्या वडिलांनी व भावांनी स्वाक्षरी व अंगठे केलेले आहेत. त्यावर संशयित विकास बाळू देवकर याने लागलीच नागटिळक यांच्या हातातील तो जबाब जबरदस्तीने घेऊन फाडून टाकून दुसरा जबाब घ्या असे म्हणाला.
यावेळी त्याने शिवीगाळी करून सरकारी काम करण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर त्याने स्वतःचे हस्ताक्षरात जबाब लिहिला व त्यावर वडिलांची स्वाक्षरी घेतली. मग तो जबाब मंडळ अधिकारी नागटिळक यांच्याकडे दिला. तो जबाब कागदपत्रात सामील करून विकास बाळु देवकर याने मी नोंदविलेला जबाब फाडून टाकल्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून सरकारी कामात अडथळा केल्याने त्याची तक्रार करमाळा पोलिसात दिली. याबाबत करमाळा पोलिसांत पोलीस असलेल्या संशयित आरोपी बाळू देवकर (रा. केम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ हे याचा तपास करीत आहेत.