गुळवंची : उत्तर तालुका परिसरात झालेल्या अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाने नाला बिल्डिंग, पाझर तलाव 50 टक्के भरले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तालुक्यातील ओढे तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र आहे.
गेले दहा वर्षांत या नक्षत्राचा अवकाळी पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात झाला नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. आठ दिवसानंतर वापसा झाल्यास खरिपाच्या पेरण्या सुरू होतील असे सांगण्यात येत आहे. खरिपाच्या पेरणीमध्ये उडीद, तूर, बाजरी, मटकी, मूग, सोयाबीन यासारखे पिकांचे उत्पादन घेतले जाते. नाला बिल्डिंग, पाझर तलावात सध्या 50 टक्के पाणी जमा झाल्यामुळे बोर व विहिरींना पाणी वाढले आहे.
गेल्या आठ-दहा दिवसापासून तालुका परिसरात अवकाळी पाऊस सायंकाळच्या दरम्यान रोज हजेरी लावत असल्यामूळे शेतातील भाजीपाला, टमाटे, वांगे, दोडके या पिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 24 मे पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
थोडा जरी पाऊस झाला तरी तालुका परिसरामध्ये जवळपास आठ ते दहा तास वीज गायब होत आहे. मागील तीन दिवसात पूर्ण रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता. यामुळे तालुका परिसरातील ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली. विजेचा लपंडावही कायम आहे.तालुक्यातील अधिकारी व राजकीय नेत्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा गायब न होण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे.