टेंभुर्णी : टेंभुर्णी एमआयडीसी परिसरात अवैध मुरूम माफियांनी अक्षरशः हैदोस घातला असून त्यांच्या कारनाम्यामुळे टेंभुर्णी शहरासह सहा-सात गावांना दोन दिवस विजेचा नाहक त्रास सहन करावा लागला असल्याचे समोर आले आहे. मुरूम काढताना जेसीबीचा 33 केव्ही वीज वाहक पोलला धक्का लागून लोखंडी पोल वाकल्याने दोन मेन लाईन एक झाल्या. यामुळे स्पार्किंग होऊन मोठा आवाज झाला. स्पार्किंगमुळे टेंभुर्णी शहरासह अनेक गावांचा वीजपुरवठा बंद झाला. मात्र जीवित हानी झाली नाही.
टेंभुर्णी शहर परिसरात अवैध मुरूम माफियांनी धुडगूस घातला असून एमआयडीसीत त्यांनी एकही खुला प्लॉट मुरूम न काढता व्यवस्थित ठेवला नाही. यावर महसूल, पोलिस अथवा एमआयडीसी या कुणाचे नियंत्रण नाही. यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. एमआयडीसीतील ते वाटेल तेथील मुरूम काढतात अन दुप्पट रक्कम घेऊन हवा तेथे टाकतात. यामुळे तेथे त्यांचीच मनमानी सुरू आहे. या मुरूम माफियांना थोडे ही भान राहिले नाही. त्यांना कुणाचे ही ना भय ना भीती अशी अवस्था आहे.
त्यांना कोणीही विचारीत नसल्याने त्यांची एवढी मजल वाढली आहे की, त्यांनी एमआयडीसीतील वीज महापारेषण केंद्राच्या मागील बाजूस अवैध मुरूम उत्खनन, खोदकाम करताना 33 केव्ही मेन लाईन आहे याचाही त्यांना विसर पडला. या महापारेषण केंद्राजवळ ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या विजेच्या पोलचे मोठे जाळे आहे. त्या ठिकाणी मुरूम काढणाऱ्यांनी चालू वीज कनेक्शन असलेले पोल असून हे धोकादायक आहेत याचे भान न ठेवता जेसीबीने पोलच्या बाजूने मुरूम उत्खनन करून काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलला धक्का लागून पोल वाकडा झाला.यामुळे आढेगावास जाणारी 33 केव्ही मेन लाईन टेंभुर्णी 33 केव्ही मेन लाईनवर पडली. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे टेंभुर्णी शहरासह परिसरातील सहा-सात गावांना याचा फटका बसला.
रात्री उशिरा टेंभुर्णी शहरातील वीज तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून सुरळीत झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा काम करण्यासाठी शहरातील वीज बंद ठेवण्यात आली. वाकलेल्या पोलला दोन्ही बाजूंनी टेकन देऊन तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. मात्र ग्रामीण भागात दोन दिवस विजेविना त्रास सहन करावा लागला. एवढे होऊनही ना दाद ना फिर्याद अशी अवस्था आहे. तसेच महसूल व पोलिस प्रशासनानेही हाताची घडी व तोंडावर बोट हे धोरण स्वीकारले आहे. यामुळे सामान्य लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.