पोखरापूर : मोबाईल फुटल्याने मुलगा सतत आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी करत होता. मात्र थोडे दिवस थांब पैसे आले की, आपण मोबाईल घेवू असे आई-वडिलांनी सांगितल्याने तो नाराज होता. त्यातूनच २१ वर्षीय बी.बी.ए.च्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना मोहोळ शहरात असलेल्या जिजाऊ अपार्टमेंट मध्ये ४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. प्रणव जगदीश मायाचारी असे जीवन संपवलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदीश गुरुलिंग मायाचारी यांचे मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर इलेक्ट्रीक दुकान ऊह्. ते मोहोळ पुणे रस्त्यालगत असलेल्या जिजाऊ अपार्टमेंटमध्ये पत्नी व मुलगा जगदीश यांच्यासह राहण्यास आहेत. प्रणव हा एम.आय.टी. कॉलेज येथे बी.बी.ए चे शिक्षण घेत होता. त्याचा मोबाईल मागील ७ दिवसांपूर्वी फुटला होता, त्यामुळे तो जगदिश व त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्याकडे मला मोबाईल घेवून द्या असे नेहमी म्हणत होता. परंतु त्याच्या आई-वडीलांनी त्यास थोडे दिवस थांब, पैसे आले की आपण मोबाईल घेवू असे समजावून सांगितले होते. पण तो नाराज झाला होता. दरम्यान दि. ०३ एप्रिल रोजी रात्री १० वा.चे सुमारास प्रणव हा जेवण करुन घराच्या दुस-या मजल्यावर असलेल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला.
दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. ०४) सकाळी ७.३० वा.सुमारास प्रणव अजून खाली कसा आला नाही हे पाहण्यासाठी त्याची आई तो झोपलेल्या खोलीजवळ गेली. दरम्यान त्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी प्रणव यास आवाज दिला. परंतु आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी प्रणवचे वडील जगदीश यांना बोलावून घेऊन दरवाजा तोडून रुममध्ये जावून पाहिले असता, प्रणव हा नायलॉनच्या रस्सीने छताचे पंख्यास गळफास घेवून लटकत असल्याचे दिसले. तात्काळ त्याचा गळफास सोडवून ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल केले असता, तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत जगदीश मायाचारी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.