सोलापूर : स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे करण्यात आलेल्या उद्यानाचे खासगीकरण केले गेले आहे. हे काम करताना कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतले नाही, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील हुतात्मा बाग आ. विजयकुमार देशमुख यांना विश्वासात न घेता भाडेतत्त्वावर खासगीकरण केल्यामुळे संतप्त झालेल्या आ. देशमुख यांनी उपायुक्त विकास लोकरे यांची कानउघडणी करत त्यांना चांगलेच झापल्याचे समजते. या संदर्भात आ. देशमुख यांना संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणास दुजोरा दिला. तसेच अधिकार्यांनी महापालिका विकायला काढल्याचा आरोपही त्यांनी केला.
सोलापुरात स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधीची कामे करण्यात आली. सदरच्या कामांची देखभाल, दुरुस्ती प्रलंबित आहे. त्यामुळे या सर्व कामांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरात स्मार्ट सिटींतर्गत विकसित केलेली आठ ठिकाणे महापालिकेने खासगी संस्थेला चालवण्यास देण्याबाबत निविदा काढली. त्यानुसार शुक्रवारी (दि. 18) संबंधितांना वर्क ऑर्डर देखील देण्यात आल्या. मीडिया हाउस - प्रोप्रायटर आस्था मुकेश तिवारी, महंशा महिला बचत गट - अध्यक्ष सना खरादी, स्वामीनाथन नरेंद्र कल्याणशेट्टी, इम्पोरियल क्लब - शौकत पठाण, आकृती डेव्हलपर्स अँड कंन्टक्शन - अक्षय अर्जुन वाकसे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी - कमलेश पिसाळ, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - प्रोजेक्ट मॅनेजर मनोज कुलकर्णी, आतिश नामदेव कारंडे यांना या कामाचा मक्ता देण्यात आला.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील हुतात्मा बागेचा मक्ता देताना आ. देशमुख यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही माहिती कळताच त्यांनी उपायुक्त आशिष लोकरे यांना फोन लावला आणि फोनवरच त्यांची कान उघडणी केली. खासगी संस्थांना मक्ता देण्याची प्रक्रिया करताना मला काहीच कल्पना का दिली नाही, माझ्या मतदारसंघातील हे काम आहे. लोकप्रतिनिधींना का विश्वासात घेतले नाही, मनमानी कारभार चालू आहे का, महापालिका विकायला निघालात का... अशा शब्दात उपायुक्त आशिष लोकरे यांची आ. देशमुखांनी चांगलीच खरडपट्टी केली.
त्यानंतर या संदर्भात महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना देखील फोन करून आ. देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. उपायुक्तां संदर्भात अनेक तक्रारी आहेत. किती दिवस त्यांना पोसणार आहात, जाता जाता महापालिका विकून चालले आहेत ते. तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देत नाही, अशा शब्दात आपली आ. देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुधारणा करण्यात आलेल्या हुतात्मा बागेचे खासगीकरण करताना मला कल्पना दिली नाही. उद्यान विभागाचे अनेक कर्मचारी असताना देखील या बागेची देखभाल, दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे ही बाग ओसाड होत चालली आहे. याकडे अधिकार्यांचे लक्ष नाही. सर्वत्र मनमानी कारभार चालू आहे. उपायुक्तांची लवकरात बदली होणार आहे, त्यामुळे जाता जाता महापालिका विकून जाण्याचा त्यांचा सपाटा चालू आहे. त्यामुळे फोन करून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. आयुक्तांकडे या संदर्भात तक्रार देखील केली आहे.- आ. विजयकुमार देशमुख