विनोद बाबर
पानीव : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील महत्त्वपूर्ण दुसरे गोल रिंगण मंगळवार, दि. २१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता खुडूस फाटा (पानीव पाटी) येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर खुडूस ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यावतीने रिंगण सोहळ्याच्या नियोजनाची व आवश्यक सुविधांची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार ज्योतीराम वाघ व जयवंत सिद यांच्या जागेत भरविण्यात येते. पालखी मार्गावरील हा रिंगण सोहळा वारकरी, भाविक आणि परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असतो. दरवर्षी याठिकाणी हजारो वारकरी व भाविक उपस्थित राहून माऊलींच्या दर्शनाचा आणि रिंगण सोहळ्याचा लाभ घेतात.
रिंगण सोहळ्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या वतीने रिंगणस्थळाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियोजन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच स्वागताची तयारी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ‘संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ या संतवचनानुसार पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी व भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी भाविकांसाठी भोजन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार असून सेवाभावी वृत्तीने ग्रामस्थ विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
माऊलींच्या पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवक तयारीत असून, रिंगण सोहळा शांततेत, शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी ग्रामपंचायत व प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.