Solapur News: योगदंडाच्या पूजेने सोलापूरच्या गड्डा यात्रेच्या विधींना प्रारंभ Pudhari Photo
सोलापूर

Solapur News: योगदंडाच्या पूजेने सोलापूरच्या गड्डा यात्रेच्या विधींना प्रारंभ

योगदंडाची विधिवत पूजा शनिवारी दुपारी शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ॲड. रितेश थोबडे यांच्या हस्ते करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सिद्धेश्वर महाराज यांच्या हातातील योगदंडाची विधिवत पूजा शनिवारी दुपारी शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ॲड. रितेश थोबडे यांच्या हस्ते करण्यात आली. योगदंडाच्या पूजनाने सिद्धेश्वर महाराज अक्षता सोहळ्यातील धार्मिक विधीस प्रारंभ झाला. शेटे वाड्यास झेंडू शेवंतीच्या फुलांनी वाड्याला सजविण्यात आले होते.

अक्षता सोहळ्याच्या आधी नववधू-वरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवू घालण्याची प्रथा आहे. शिवयोगी सिद्धेश्वर महाराज सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वी कसब्यातील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते. तीच परंपरा कायम ठेवून सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडास केळवणासाठी शेटे यांच्या वाड्यात आणून, केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मनोभावे विधिवत पूजा केली जाते.

शनिवारी दुपारी साडेबारा वाजता मानकरी शिवशंकर कंठीकर यांनी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड कै. शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले. यावेळी मानकरी हिरेहब्बू हे शेटे वाड्यात आल्यानंतर योगदंडास चौरंगी पाटावर ठेऊन विभुती, कुंकुम, फुले वाहून संबळाच्या निनादात विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर होमहवन करण्यात आले. शेटे यांचे वारसदार व ॲड.मिलिंद थोबडे त्यांचे चिरंजीव ॲड. रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू यांची पाद्यपूजा केली.

केळीच्या पानामध्ये योगदंडास पुरणपोळीचा नैवैद्य दाखविण्यात आला. शेटे यांचे वारसदार ॲड.मिलिंद थोबडे यांचे चिरंजीव ॲड. रितेश थोबडे यांनी पूजा केली. यावेळी ॲड. मिलिंद थोबडे, सुचेता थोबडे, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT