सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. मंगळवार, दि. 1 जुुलैपासून शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दोन टप्प्यामध्ये तीन तासाऐवजी अडीच तास पाणीपुुरवठा केला जाणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून शहरातील इतर भागात या प्रयोग केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.
शहरातील काही भागात पाच दिवसाआड तर काही भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करणार्या तीन स्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्याशिवाय पाण्याची मागणी कमी झाली आहे. सध्या उजनी - सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाली आहे. चार पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. चार पंप पूर्ण क्षमतेने 170 एमएलडी पाणी उपसा करत आहेत. त्यामुुळे शहराला एक जुलैपासून तीन दिवसाआड तर काही भागात चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणी उपसाही पूर्ण क्षमतेने होत आहे. फ्लो मीटरवर दररोज 170 एमएलडी पाणी उपसा होत असल्याची नोंद आहे. सध्या शहराला तीन तास पाणी दिले जात आहे. या पाण्याचे तास कमी करून ज्या भागात चार दिवसाआड पाणी येते त्या भागाला तीन दिवसाआड तर ज्या भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा आहे. त्या भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबाजावणी 1 जुलैपासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे आता घरातील नळाला तीन तासा ऐवजी दोन ते अडीच तास पाणी येणार आहे. या निर्णयामुळे पाण्याचा एक दिवस आणि अर्धातास पाणी कमी होणार आहे.