सोलापूर : मागील भांडणाचा राग मनात धरुन महिलेवर चाकूने वार केल्याची घटना श्रीशैल नगर येथे घडली. विजय हणमंत पुजारी (वय ३६, रा. श्रीशैल नगर, सोलापूर) याने फिर्याद दिली आहे. घराशेजारी राहणारा प्रभुलिंग तोटद हा मागील भांडणाचा राग मनात धरुन पुजारी यांच्या घरासमोर चाकू घेऊन आला. शिवीगाळ करीत तुला खल्लास करतो अशी धमकी दिली, घरासमोर लावलेली दुचाकी पाडून नुकसान केले. त्यानंतर पुजारी यांची आई सोडविण्यासाठी गेली असता त्यांच्या हातावर चाकूने वार करुन पळून गेला.त्यानंतर महेश तोटद याने देखील तुला लई मस्ती आली आहे का म्हणत मारहाण केली. याबाबत प्रभुलिंग तोटद व महेश तोटद यांच्यावर जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंगभवन बसस्टॉपवरून बॅग पळवली
शहरातील रंगभवन बसस्टॉप येथे बसची वाट पाहणाऱ्या महिलेची बॅग चोरट्याने लांबवली. रेखा सुनील डांबरे (वय ३०, रा. विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) हि पती, बहीण व तीन लहान मुलांसह रंगभवन बसस्टॉपवर बसची वाट पहात होती. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तिच्या हातातील लेदरबॅग लंपास केली. यामध्ये एक तोळे सोन्याचे मणीमंगळसूत्र व रोख रक्कम असा एकूण ८३ हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉस्पिटलमधून पेशंटचे दागिने लंपास
रंगभवन जवळील आदर्श हॉस्पिटलमध्ये ॲडमीट असलेल्या पेशंटचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. गणपत लालू राठोड (वय ६७, रा. शिवाजी नगर स्टेशन जवळ, अक्कलकोट) यांची पत्नी आदर्श हॉस्पिटल येथे ॲडमीट आहे. तेथील स्पेशल रुममधू प्रवेश करुन त्यांच्या पत्नीच्या पर्समधील सोन्याचे मनी मंगळसूत्र, सोन्याचे कानातील टॉप्स आणि सोन्याची नथ असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.