सोलापूर : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी साखर कारखानदारांची बैठक घेतली. त्यात केंद्र शासनाच्या एफआरपीनुसार दर देणे बंधनकारक असून त्यांना दर जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील 34 पैकी 22 कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला आहे. परंतु प्रति टन उसास पहिली उचल 3500 रुपये इतकी शेतकरी संघटनेची मागणी ही असताना 2850 ते 3001 रुपयांवर बोळवण केली आहे.
माळशिरस तालुक्यातील पांडुरंग सहकारी कारखान्याच्या गव्हाण्यात उतरून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. तर लोकमंगल, सिद्धेश्वर कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक बनल्याने 3500 रुपये प्रति टन उसास पहिली उचल देण्याची मागणी होत आहे.
गेल्या महिनाभरांपासून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठक घेतली. जिल्हा महसूल प्रशासनातील महसूल उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी दररोज साखर कारखानदारांशी ऊसदराबाबत आढावा घेत आहेत. उर्वरित साखर कारखाने येत्या दोन दिवसांत जाहीर करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देणे बंधनकारक असून, त्यासाठी कारखानदारांची बैठक घेतली. जिल्ह्यातील बहुतांश कारखानदारांनी ऊस बिल जाहीर केले आहेत. उर्र्वरित कारखान्यांनाही ऊस बिल जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.-कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी