सोलापूर : शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी लवकरच नवीन बसेस दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील बसथांब्यांची दुरवस्था दूर करण्याबाबत महापालिकेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. नवीन बसेस शहरात दाखल होण्याच्या काळात सध्या असलेल्या बसथांब्यांची दुरुस्ती तसेच आवश्यक ठिकाणी नवीन बसथांबे उभारण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनी दिली.
सध्या शहरातील अनेक बसथांबे जीर्ण अवस्थेत असून छतावरील पत्रे खराब झाले आहेत. अनेक ठिकाणी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था नाही, तर काही ठिकाणी तुटलेल्या बाकांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना उभे राहून बसची वाट पाहावी लागते. काही बसथांब्यांच्या परिसरात झुडपे वाढल्याने अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. याशिवाय काही प्रमुख बसथांब्यांवर प्रवाशांऐवजी रिकामटेकडी मंडळी दिवसभर बसलेली दिसतात. काही जण मोबाईलवर चित्रपट पाहणे किंवा गेम खेळत वेळ घालवत असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. काही ठिकाणी मनोरुग्णांनीही बसथांब्यांवर ठाण मांडल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या सर्व बाबींची दखल घेत महापालिका प्रशासनाने बसथांब्यांची दुरुस्ती, स्वच्छता, तुटलेल्या बाकांची दुरुस्ती आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन बसथांबे उभारण्याची कार्यवाही नवीन बसेस सुरू होण्याच्या दरम्यान, हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नविन बस लवकरच दाखल होणार आहेत. या संदर्भात झालेल्या बैठकीत शहरातील बस थांब्या विषयी चर्चा झाली आहे. जिथे बस थांब्यांची दुरूस्ती आवश्यक आहे. तिथे ती दुरूस्ती केली जाईल. तसेच जिथे नविन बस थांब्याची गरज आहे. तिथे बस थांबा तयार करण्यात येणार आहे.रंजिता चाकोते सभापती, स्थायी समिती, सोलापूर महानगरपालिका