सोलापूर : भय्या चौकातील रेल्वे पूल रविवारी (दि. 14) दुपारी पाडण्यात येणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून सर्व यंत्रणा कामाला लागली असून पुलाच्या बाजूचे लोखंडी कठडे काढण्यात आले आहेत. पुलावरील डांबरी रस्त्याचे आवरण हटविण्यात आले आहे. 103 वर्षांपासून कामगार, कष्टकऱ्यांसह सोलापूरकरांशी भावनिक नाते असणारा हा रेल्वेपूल रविवारी इतिहासजमा होत आहे.
विकासाची गंगा वाहत असताना त्यामध्ये येणारे दगड बाजूला काढण्ो ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सोलापुरात रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर मंगळवेढ्याला जाण्यासाठी मार्गच उरला नाही. त्यामुळे इंग्रजांनी 1920 च्या सुमारास भय्या चौक ते मंगळवेढा रस्त्यावर रेल्वे मार्गावर हा पूल बांधला. त्यानंतर मंगळवेढा रोडवर पुलाच्या बाजूला लक्ष्मी विष्णू मीलची उभारणी झाली. कामगार कष्टकरी यांना येण्या-जाण्यासाठी हा पूल सोईस्कर ठरू लागला. सुमारे शंभर वर्षे हा मोठ्या दिमाखात उभा होता.
दरम्यान, 2022 साली इंग्रजांनी सोलापूर महानगरपालिकेला पत्र पाठवून या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे तो पूल कालबाह्य झाला आहे. त्याच्या भक्कमपणाबाबत विचार करावा अशी सूचना केली. त्यानंतर महापालिका आणि रेल्वे प्रशासन जागे झाले आणि हा ऐतिहासिक पूल पाडून नव्याने पूल उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या. आता आज रविवारी या पुलाचा मुख्य ढाचा पाडण्यात येणार आहे.
पूल पाडणार याची घोषणा होताच सोलापुरातील पुलावर छायाचित्र काढण्यासाठी नागरीकांची गर्दी होऊन लागली. 1922 या अंकाची पाटी कोरलेल्या ठिकाणी सेल्फि काढण्याचा ट्रेंड सुरु झाला. अनेक वर्षे या पुलावरुन जाणाऱ्या कामगार, कष्टकऱ्यांच्या भावना दाटून आल्या. पुलासोबतचे भाविकन नाते संपून केवळ आठवणी उरणार आहेत. रविवारी दुपारी पूलाचा मुख्य ढाचा पाडण्यात येणार असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला असून काही तास रेल्वे वाहतूक ठप्प राहणार आहे.