आमसिद्ध व्हनकोरे
सोलापूर : शहरातील ब्रिटिशकालीन एकमेव नर्सिंग कॉलेज (तीन वर्षांचा अभ्यासक्रम) (जीएनएम) राज्य शासनाने बंद केले. याबदल्यात नव्याने बीएस्सी नर्सिंग असे पदवी कॉलेज (चार वर्षांचा अभ्यासक्रम) सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येथील वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला. मात्र, नर्सिंग पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याविषयी शासनाचा आदेश स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे नवे कॉलेज तर सुरू झालेच नाही, उलट तीन वर्षांचा अभ्यासक्रम असलेला जुना कोर्सही बंद पडला आहे.
सोलापुरात १९४३ मध्ये ब्रिटिशांनी नर्सिंग कॉलेज हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठी ५० विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली होती. मात्र, राज्य शासनाने आठ वर्षांपूर्वी यामध्ये हस्तक्षेप करत ५० वरून प्रवेश क्षमता २० वर आणली. त्यानंतर आता म्हणजे दोन वर्षांपूर्वी हा अभ्यासक्रमच बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला अन् त्याची अंमलबजावणीही केली. दरम्यान, पूर्वीचा अभ्यासक्रम बंद करताना राज्य शासनाने नव्याने म्हणजे चार वर्षांचा नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याचे मधाचे बोट सोलापूरकरांच्या तोंडाला पुसले. मात्र, याही घटनेला दीर्घकाल लोटला, तरी अद्याप नवे कॉलेजही सुरू झाले नाही अन् जुने आधीच बंद करून टाकले आहे. हा सोलापूरकरांवर घोर अन्याय असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळात आहे. नव्या चार वर्षांच्या नर्सिंग अभ्यासक्रमासाठी १०० प्रवेश क्षमतांचा पर्याय सोलापूरसाठी शासनाकडून देण्यात आला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून याविषयी काहीच प्रगती झाली नाही.
दरम्यान, याविषयी सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री अनुक्रमे चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे आणि विद्यमान जयकुमार गोरे यांच्याकडे महाविद्यालय प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला. मात्र, यातील एकाही पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घातले नाही. तसेच खा. प्रणिती शिंदे आणि खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या कानावरही हे प्रकरण घातले, त्यांच्याकडूनही काही प्रयत्न झाले नसल्याची खंत महाविद्यालय प्रशासनातील सूत्रांनी ‘पुढारी’कडे व्यक्त केली.