मोहोळ : अनगर नगर पंचायतच्या नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी २६ जानेवारी २०२६, प्रजासत्ताक दिनापासून अनगर येथे एक अभिनव आणि धाडसी निर्णय अमंलात आणला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी दररोज सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
आजच्या काळात मोबाईल, टीव्ही व सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी अभ्यास, वाचन व आत्मविकासावर लक्ष केंद्रित करावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी सांगितले.
या निर्णयामुळे पालकांनीही विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, घरामध्ये अभ्यासाला पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अनगर नगर पंचायतचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, इतर नगरपालिकांसाठीही हा निर्णय आदर्श ठरण्याची शक्यता आहे.