सोलापूर : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नवी पेठ मुुख्य बाजार पेठसह शहरातील दहा मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण मोहीम घेतली जाणार आहे. लवकरची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याने अतिक्रमणधारकांना स्पीकरवरून रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले जात आहे. मोहिमेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी दिली.
शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी नियोजन केले आहे. नगररचना विभागाच्या वतीने या रस्त्यांची मोजणी केली आहे. डीपीआरमध्ये नियोजित रस्ता किती आहे. त्यावर किती अतिक्रमण झाले आहे. त्यांची माहिती अतिक्रमण विभागास दिली आहे. नकाशादेखील दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागाची संयुक्त मोहीम घेतली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात जनता बँक ते मोबाईल गल्ली, जुने विठ्ठल मंदिर परिसर, दत्त चौक ते सिद्धेश्वर मंदिर परिसर, मेकॅनिक चौक ते नवी पेठ या रस्त्यावर कारवाई होणार आहे. त्यानंतर विजापूर वेस ते बेगम पेठ पोलिस चौकी, जुळे सोलापुरातील भारती विद्यापीठ ते डी-मार्ट चौक या रस्त्यावर कारवाई होणार आहे. नवी पेठेत संसारोपयोगी साहित्य विकणार्या दुकानदाराचे ‘घर आणि संसार’ रस्त्यावरच असतो. या दुकानदारांवर पहिल्यांदा कारवाई होणार असल्याने दोन दिवसांपासून या भागातील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केेले जात आहे.
मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. पोलिस बंदोबस्त सज्ज ठेवला आहे. दोन दिवसांत मोहीम घेतली जाणार आहे. महापालिकेच्या वतीने अतिक्रमण काढल्यास पाडकाम खर्च वसूल केला जाणार आहे अथवा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हे टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले जात आहे.- तपन डंके, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी