सोलापूर : नई जिंदगी परिसरात असलेल्या एका भंगार गोडाऊनला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीपासूनच आग प्रचंड भडकलेली असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. जवळपास 30 ते 35 अग्निशमन गाड्यांच्या मदतीने पाण्याचा मारा करत तब्बल सात तास अथक प्रयत्न सुरू होते. अखेर दीर्घ प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले.
या आगीत गोडाऊनमधील सर्व भंगार साहित्य जळून खाक झाले असून कारखाना मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्टसर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला आहे.