माढा : माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक शिवारात सरकारी जमिनीतून मोठ्या प्रमाणात मुरूम काढून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी 12 लाख 59 हजार 700 रुपयांच्या अवैध उत्खननाचा गुन्हा माढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंडल अधिकारी प्रसाद सोनवणे यांनी माढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, माढाशेटफळ रस्त्यालगत गालीशाबाबा दर्ग्याजवळील गट क्रमांक 306 मधील सरकारी जमिनीतून अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा करून तो चोरून नेला. तत्कालीन तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी सोनवणे, उपविभागीय अभियंता एस. डी. हेलकर तसेच पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी पाहणी करण्यात आली. या पाहणीत सुमारे 2099.50 ब्रास मुरूम अवैधरित्या काढून नेल्याचे समोर आले. उपविभागीय अभियंता हेलकर यांनी केलेल्या मोजमापानुसार या मुरूमाची किंमत 12 लाख 59 हजार 700 रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यानुसार पंचनामा करण्यात आला.
शासनाची कोणतीही परवानगी न घेता आणि पर्यावरणाचा ऱ्हास होईल हे माहीत असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सरकारी जमिनीतून मुरूमाचे उत्खनन करण्यात आल्याची तक्रार महसूल प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.