श्रीशैल हुळ्ळे आणि प्रभाकर हणमंत फुलारी  
सोलापूर

Solapur Crime : पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घाल

आ. कल्‍याणशेट्टींच्‍या खुनाची सुपारी देण्याचा प्रयत्न स्वतः चालकाने उधळला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : ‘तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघतो’ असे म्‍हणत आ. सचिन कल्‍याणशेट्टी यांच्‍या चालकाला पैशाचे आमिष दाखवून खुनाची सुपारी देण्याचा प्रयत्‍न सोलापुरात घडला. याप्रकरणी चालक आनंद स्‍वामीराव सुरवसे (रा. मोट्याळ, ता. अक्‍कलकोट) यांच्‍या फिर्यादीवरून दोघांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

श्रीशैल हुळ्ळे (रा. वडदेगाव, ता. दक्षिण सोलापूर) आणि प्रभाकर हणमंत फुलारी (वय २३, रा. मल्‍लिकार्जुन नगर, अक्‍कलकोट रोड, सोलापूर) अशी गुन्‍हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. यातील प्रभाकरला अटक झाली असून, त्‍याला न्‍यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर श्रीशैलचा शोध सुरू आहे. गुन्‍ह्याचा तपास सहा. पोलिस निरीक्षक राहुल सावंत करीत आहेत.

घटनाक्रम

  • शुक्रवारी (दि. ७) आ. सचिन कल्‍याणशेट्टी यांची पत्नी व मुलाला घेऊन चालक आनंद सुरवसे होटगी रोडवरील महावीर चौकातील शोरूममध्ये आले.

  • आमदारांचे कुटुंबीय शोरूममध्ये खरेदीसाठी गेल्यावर सुरवसे बाहेर थांबले.

  • याचवेळी प्रभाकर फुलारी व श्रीशैल हुळ्ळे हे आनंद सुरवसे यांच्‍याजवळ आले आणि बोलण्यास सुरुवात केली.

  • श्रीशैलने आनंद याला ‘तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघतो’ असे सांगितले.

  • फुलारीने ‘तुला साहेब काय म्‍हणतात ते नीट ऐक, त्‍यात तुझा फायदा आहे’ असे सांगितले.

  • आनंदने तत्‍काळ आ. कल्‍याणशेट्टी यांच्‍या पी.ए. आणि भावाला याची माहिती दिली.

  • पोलिसांना संपर्क साधल्यावर त्यांनी घटनास्‍थळावरील सीसीटीव्‍ही फुटेजची तपासणी केली.

  • चौकशीअंती आनंद सुरवसे यांच्‍या फिर्यादीवरून ९ ऑगस्‍ट रोजी गुन्‍हा दाखल करण्यात आला.

श्रीशैल हुळ्ळे रेकॉर्डवरील गुन्हेगार

या प्रकरणातील संशयित श्रीशैल हुळ्ळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्‍यावर या अगोदर तडीपारीची कारवाई झाली आहे. आमदारांच्या सुरक्षेशी आणि हत्येच्या कटाशी संबंधित हा प्रकार असल्याने पोलिस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. या कटामागे कोणता हेतू होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.

निवडणुकीवेळी आ. कल्‍याणशेट्टी विरोधात काम

श्रीशैल हुळ्ळे हा सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपाकडून इच्‍छुक असल्याचीही चर्चा होती. त्याशिवाय त्याने विधानसभा निवडणुकीच्यावेळी आ. सचिन कल्‍याणशेट्टी यांच्याविरोधात काम केल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. याविरोधातूनच किंवा अन्य कोणत्या कारणावरून त्याने चालकाला आमदारांच्या खुनाची सुपारी देण्याचा प्रयत्न केला याबाबत पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT