सोलापूर : रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी आमच्या बांधावरील माती का घेता, त्यामुळे बांध खचून जाईल, असे म्हणत तिघांना शिवीगाळ केली. मारहाण करत त्यातील एकाच्या डोक्यात टिकावाने मारून गंभीर जखमी करून खून केला. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. राणे यांनी एकास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
पाटकूल (ता. मोहोेळ) येथे अनिल गोरखनाथ घोडके आणि त्यांचे मोठे भाऊ सुनील गोरखनाथ घोडके हे दोघेही शेती करून उपजीविका करतात. 2021 साली त्यांच्या शेतातील ऊस कारखान्याला जाणार होता. 26 नोव्हेंबरला सुनील घोडके त्यांचा मुलगा संग्राम व अनिल घोडके हे ऊस जाणार्या रस्त्यावर खड्डे बुझवण्यासाठी खोर्या व टिकाव घेऊन जालिंदर गावडे यांच्या बांधालगत रस्त्यावरची माती घेऊन खड्डे बुजवत होते.
त्यावेळी जालिंदर विठोबा गावडे, अरुण जालिंदर गावडे, संतोष राजाराम येडके, अक्षय संतोष येडके, रोहन संतोष येडके, चांगदेव विठोबा गावडे हे (सर्व रा. पाटकूल) हातामध्ये काठ्या घेऊन घोडके बंधूंजवळ आले. अरुण गावडे व जालिंदर गावडे यांनी आमच्या बांधाकडची माती घेऊन तुम्ही रस्त्यावरील खड्डे का बुझवत आहात, आमचा बांध खचून जाईल, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. सुनील घोडके यांनी आमचा ऊस कारखान्याला जाणार असून आम्ही रस्त्यावरील मातीने खड्डे बुजवित आहोत, असे सांगत असतानाच जालिंदर गावडे व चांगदेव गावडे यांनी धरा, याला सोडू नका, हा नेहमीच आपल्याला त्रास देतो. याला खलास करा, असे म्हणत संतोष व रोहन येडके यांनी सुनील घोडके याला धरले.
अरुण गावडे यांनी रस्त्यावरील टिकाव घेऊन सुनील घोडके यांच्या डोक्यामध्ये जोरात मारला. अनिल व संग्राम घोडके यांनाही मारहाण केली. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सुनील गोरखनाथ घोडके याचा मृत्यू झाला. मोहोळ पोलीसांनी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अॅड प्रदिपसिंह रजपूत, आरोपीच्या वतीने अॅड. धनंजय माने यांनी काम पाहिले.
या गुन्ह्यात सरकार पक्षाच्या वतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील अॅड. प्रदिपसिंह रजपूत यांनी युक्तीवाद करीत आरोपीने रागाच्या भरात किरकोळ कारणावरून मारहाण करून ठार मारल्याचे सांगितले. न्यायालयाने पंचनामे, रक्ताचे नमुने, सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून सुनिल घोडके यांचा खून केल्याप्रकरणी अरूण गावडे याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार नुकसानभरपाई देण्याची शिक्षा सुनावली.