सोलापूर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळीत रविवार हा प्रचाराचा संडे ठरला. जाहीर सभा, प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, पदयात्रा, कॉर्नर सभांमुळे शहरातील वातावरण निवडणूकमय झाल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून चिन्ह वाटप करून निवडणुकीची अंतिम यादी जाहीर केल्यानंतर आता सर्व पक्ष झटून प्रचाराला लागले आहेत.
प्रचारासाठी फक्त दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. 13 जानेवारी सायंकाळी प्रचाराची सांगता करावी लागणार आहे. पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्यांच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सकाळपासूनच शहरातील प्रमुख चौक, वसाहती आणि प्रभागांमध्ये प्रचाराचा जोर पाहायला मिळाला. प्रचाराच्या पुढील टप्प्यात घरोघरी जाऊन संपर्क साधणे, कॉर्नर सभा, लहान बैठकांवर भर देण्यात येणार आहे.
थेट मतदारांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि भावी धोरणे मांडण्यावर उमेदवारांचा भर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचाराला गती देण्यात येत असून तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.