Solapur Municipal Corporation Election  Pudhari Photo
सोलापूर

Solapur Municipal Elections: महापालिका निवडणूक, भाजपाचा वारु सुसाट

प्रचारात भाजपाची सरशी, विकासाच्या मुद्द्यांवर भर

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका निवडणुकीत भाजपाने 75 पारचा नारा दिला होता. त्या अनुषंगाने भाजपाने संपूर्ण प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. अनेक प्रभागात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदयात्रा, सभांचा धडाका लावला होता. भाजपा विकासाचा मुद्दा घेऊन या निवडणूकीत उतरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टर्निंग पॉईंट ठरलेली सभा आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह चारही आमदारांचे विकासाचे व्हिजन यामुळे भाजपाचा वारु सुसाट झाल्याचे दिसत आहे.

भाजपाने पहिल्यापासून विकासाच्या मुद्द्यावर भर देत सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि चारही आमदारांनी पाणी, विमानसेवा, आय टी पार्क, पर्यटन आराखडा, धूळमुक्त शहर अशा विकासाच्या मुद्दयांवर प्रचार सुरु केला. केंद्रात भाजपाचे सरकार, राज्यात भाजपाचे सरकार आता महापालिकेतही पुन्हा भाजपा सरकार आले, तर सोलापूरच्या विकासाला एक नवी उर्जा मिळेल हे ठासून सांगण्यात भाजपा नेते यशस्वी ठरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुहरी पाईपलाईनसाठी 892 कोटी रुपये दिले आणि त्याचे काम सुरु झाले. सोलापूरची विमानसेवा सुरु झाली आता नाईट लँडींगसाठी प्रयत्न सुरु आहेत. आयटी पार्कची घोषणा झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात जागा निश्चित होऊन काम सुरु झाले. वर्षभरात आयटीपार्कची उभारणी सुरु होऊन येथील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. ही तीनही महत्वाची कामे केवळ भाजपाने करुन दाखवली. विरोधक मात्र केवळ टिका करण्यात आणि इतर गोष्टीत व्यस्त राहिले.

महापालिका निवडणूका जाहिर झाल्यापासून पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरात तळ ठोकून आहेत. चारही आमदारांना सोबत घेऊन प्रत्येक प्रभागात सभा, पदयात्रा यामध्ये स्वतः सहभागी होत आहेत. सोलापूरातील प्रत्येक भागातील प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी काय करता येईल याचा विचार पालकमंत्री गोरे करताना दिसत आहेत. याचा सकारात्मक परिणाम शहरातील नागरीकांकडून मिळत आहे. विरोधकांवर टिका करण्यापेक्षा विकासाचे व्हिजन सांगत निवडणूकीला सामोरे जात आहेत. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्देच राहिले नाहीत. भाजपाने ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर आणून ठेवली आहे.

आम्ही विकासकामे करणार तुम्ही काय करता ते सांगा हाच भाजपाचा निवडणुकीतील नारा ठरला आहे. शहराला गती देणाऱ्या तीनही कामांचा शुभारंभ झाला आता सोलापुरातील गुंठेवारीचा प्रश्न, प्राणीसंग्रहालयाची पुर्नउभारणी, बोरामणी विमानतळ, धूळमुक्त शहर, पर्यटनाचा आराखडा, एमआयडीसीत सुविधा, हद्दवाढ भागातील सोईसुविधा, आयुर्वेदिक दवाखान्याची उभारणी, शहरात मराठी बरोबरच इंग्रजी माध्यमांच्या शाळा उभारणा, कर प्रणालित सुसूत्रता आणून नागरीकांवरील करांचा बोजा कमी करणार, बांधकाम परवाने सुलभ करणार यासह अनेक आश्वासने भाजपाने जाहीरनाम्यात दिली आहे. नागरीकांना भाजपाचा विकासाचा हा जाहिरनामा आश्वासक वाटतो. प्रत्येक ठिकाणी चर्चा आहे ती केवळ विकासाची. भाजपाने संपूर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणून ठेवली आहे. यामुळे सोलापूरांचा कौल भाजपाच्या बाजूने दिसत आहे. भाजपाची एकहाती सत्ता येणार हे निर्विवाद सत्य असले, तरी त्यापेक्षा जास्त प्रतिसाद सोलापूरकरांकडून मिळत असल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT