सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शहराच्या राजकारणात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकीय हालचालींनी वातावरण तापले होते. भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवरून मोठी उलथापालथ झाली असली, तरी सर्वाधिक गोंधळ आणि बंडखोरी भाजपमध्येच पाहायला मिळाली.
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काही उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी अनेक ठिकाणी नाराज उमेदवारांनी थेट बंडखोरीचा झेंडा उंचावल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोरच मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपने शहरातील सर्व प्रभागांमध्ये जिंकण्याच्या उद्देशाने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र, अपेक्षेपेक्षा अधिक इच्छुक असल्याने अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी काही इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेत पक्षनिष्ठा दाखवली.
मात्र, अनेक जुने व निष्ठावंत कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे, अनेक प्रभागांत भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधातच भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. काही ठिकाणी तर थेट ‘भाजप बंडखोर पॅनल’ उभे राहत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजप बंडखोरास शिवसेनेचा पाठींबा
प्रभात 21 मधून भाजपचे संतोष भोसलेंनी उमेदवारी मागितली होती. मात्र यंदा त्यांचा पत्ता कट झाला असून नवख्यास उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या संतोष भोसले यांनी भाजप उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला. भोसले यांना यांना एकनाथ शिंदे गटाच्यावतीने पाठिंबा देत पुरस्कृत म्हणून उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात बंडखोरी
प्रभाग तीन हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदा त्याठिकाणी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा पत्ता कट केल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे गटांमध्ये प्रवेश केला. दुसरे उमेदवार बाबूराव जमादार यांना देखील उमेदवारी टाळल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यामुळे भाजपचे उमेदवार संजय कोळी, राजू पाटील यांच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. रंजिता चाकोते यांच्या विरोधात कुमुद अंकाराम यांनी केलेले बंड शमल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
भाजप पडला तोंडावर
प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवारीचा तिढा न सुटल्यामुळे या प्रभागात मोठा पेच निर्माण झाला. भाजपाची उमेदवारी बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी यांना मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात पॅनल उभे केले. विशेष म्हणजे पक्षाने उमेदवारी दिलेले समाधान हावळे या पॅनलमध्ये सहभागी झाल्याने भाजप सपेशल तोंडावर पडला आहे.
भाजपच्या हत्तुरेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी
भाजपाचे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटामध्ये प्रवेश करून त्यांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवत भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे.
प्रभाग सहामध्येही असंतोषाची खदखद
प्रभाग सहामध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. उबाठा सेनेची उमेदवारी असलेल्या उमेदवारांनी ऐनवेळी भाजपचा झेंडा हातामध्ये घेतल्यामुळे भाजपाच्या इतर इच्छुक उमेदवारांची मोठी गोची झाली. इच्छुक उमेदवार रेखा गायकवाड यांनी बंडाचे निशान फडकवत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. त्यांना इतर नाराज उमेदवारांनी बळ दिल्याने भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात पॅनल उभारण्याची या प्रभागात तयारी सुरू आहे.
जगदीश पाटलांना अश्रू अनावर
भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना यंदा उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाचा आदेश मानत उमेदवारी माघार घेतली. यावेळी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. डोळ्यावरचा गॉगल काढून डोळे पुसत ते तसेच बाहेर पडले.
आमदार यशस्वी झाले आत्याला राजी करण्यास
आ. देवेंद्र कोठे यांच्या आत्या कुमुद अंकाराम यांनी प्रभाग क्रमांक तीन क मधून एकनाथ शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेण्यासाठी स्वतः आ. कोठे यांनी प्रयत्न केले. अखेर त्यांना यश आले. आ. कोठे यांनी अंकाराम यांना हाताला धरून निवडणूक कार्यालयात आणत उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा फॉर्मवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले.