सोलापूर : जिल्ह्यातील एक नगराध्यक्ष आणि 24 नगरसेवकांसाठी शनिवारी (दि.20) सकाळी 7.30 ते 5.30 दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये मंगळवेढा, मोहोळ, मैंदर्गी आणि पंढरपूर नगरपालिकेचा समावेश आहे. जिल्ह्यातील अकरा नगरपालिकेची 9 डिसेंबरला मतदान प्रक्रिया होती. आता मतमोजणी रविवारी (दि. 21) होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निकालाच्या विरोधात काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा निकाल लागण्यास विलंब झाल्याने मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर आणि मैंदर्गी येथील मतदान प्रक्रिया 20 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. यामध्ये मंगळवेढा येथे एक नगराध्यक्ष, 20 नगरसेवक, मोहोळ येथे दोन नगरसेवक, मैंदर्गी एक नगरसेवक, पंढरपूर येथे एक नगरसेवकांचा समावेश असून, त्याचे मतदान शनिवारी होत आहे.
दरम्यान, रविवारी लगेच जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एक नगरपंचायतींची मतमोजणी होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी ही ईव्हीएम मशिनवर होणार असल्याने 12 वाजेपर्यंत निकाल लागणार आहे.