तब्बल आठ वर्षांनतर अखेर सोलापूर महानगरपालिकेसाठी मतदान पार पडले. एका खुनामुळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद्र कोठे विरूद्ध शिवसेनेचे नेते अमोल शिंदे यांच्यातील वादाची ठिणगी खालच्या पातळीवरील टिकेपर्यंत गेल्यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले. मात्र, आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या मतमोजणीतून होणाऱ्या फैसल्याकडे लागल्या आहेत.
ऐन गड्डा यात्राकाळात ही निवडणूक लागल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे निवडणूकच किमान सोलापूरपुरती का असेना पुढे ढकला असाही सूर निघाला. त्यासाठी चर्चा, निवेदनेही झाली. मात्र, निवडणूक कार्यक्रमात किंचिंतही फरक झाला नाही. अखेर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली.
सत्ताधारी विरूद्ध सत्ताधारी
युती विरूद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक सोलापुरात होईल, अशी चर्चा होती. किंबहूना तशी पावलेही राजकीय पटलावर पडली. मात्र, भाजप-शिवसेनेची युती होणार, अशी खात्री असतानाच जागा वाटपाच्या टेबलवर ती फिसकटली. तसेही भाजपला स्वबळावरच ही निवडणूक लढवण्याची सुप्त इच्छा होती आणि घडले किंवा घडविलेही तसेच. यामुळे एकाकी पडलेली शिंदे शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली. त्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांविरूद्ध या युतीने सर्व ठिकाणी उमेदवार दिले. त्यामुळे सोलापुरातील सामना हा तसा सत्ताधाऱ्यांतच रंगला. याचे वर्णन आज मतमोजणीचे चित्र पुढे आल्यानंतर सत्ताधारी लढले, सत्ताधारीच हरले आणि सत्ताधारीच जिंकले, असे करावे लागले.
भाजपास रोखणे आघाडीला जमलेच नाही
महाआघाडीचे पाच घटक पक्ष म्हणजे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, माकप, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पाच पक्षांनी एकीची मोट बांधण्यात त्या-त्या पक्षांच्या नेत्यांना यश आले. भाजपचे मोठे संकट दारावर आलेले पाहून या पाचही पक्षांनी सामंजस्य भूमिका घेत योग्य जागा वाटप करून भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व पक्षांचा सोलापूरच्या राजकारणातील आवाज हल्ली इतका क्षीण झाला आहे की पाचही पक्ष विरूद्ध एकटा भाजप असे चित्र कुठेही दिसलेच नाही. खरेतर भाजपमधील बंडखोरांना, नाराजांना, उमेदवारी डावललेल्यांना खिंडीत गाठून महाआघाडीने भाजप विरूद्ध भाजप बंडखोर असा सामना घडवायला हवा होता. मात्र, महाआघाडीच्या नेत्यांना हे सूचलेच नाही. त्याचा फायदा काही अंशी शिंदे शिवसेनेने घेतला. तर बऱ्याच ठिकाणी भाजपने अंतर्गत बंडाळी शांत करत निवडणुकीचे निम्मे मैदान तिथेच मारले.
वंचित आघाडीचे अस्तित्त्व ठरणार
वंचित बहुजन आघाडीचा सोलापुरच्या काही भागांवर प्रभाव आहे. त्या भागात भाजपने जरी उमेदवार दिले असले तरी जातीपातीचे राजकारण, वंचित आघाडीचे भरभक्कम उमेदवार यामुळे भाजपची तिथे डाळ शिजेल अशी स्थिती नाही. या पार्श्वभूमीवर भाजप या भागात किती मते घेणार, यावर भविष्यातील या प्रभागातील नेत्यांचे, वंचित बहुजन आघाडीचे अस्तित्त्व ठरणार, हे मात्र शंभर टक्के खरे.
कमी मतदानाचा भाजपला तोटा?
गत टर्ममध्ये सोलापूर महानगरपालिकेसाठी 59.56 टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र मतदानाचा टक्का घसरला. याचा थेट फटका भाजपला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. असे झाल्यास भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारूला काही अंशी पायबंद बसू शकतो. तरीही भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून उदयास येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सत्तेच्या सोपानाजवळ पोहोचलेल्या भाजपला अन्य छोट्या-मोठ्या पक्षांचे किंवा महापालिका निवडणुकीच्यानिमित्ताने तात्पुरते दूर गेलेल्या मात्र राज्याच्या सत्तेत मित्र असलेल्या शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हातभार मिळू शकतो.