सोलापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दहा उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नशीब आजमावत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर आणि पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष महिबूब शेख यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. अन्य स्टार प्रचारकांची एकही जाहीर सभा झाली नाही. तसेच जिल्ह्यातील चार आमदारही फिरकलेही नाहीत. शहराध्यक्ष महेश गादेकर हेच पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी एकाकी लढत आहेत.
एकेकाळी शहर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबादबा होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाकडून दहा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खा. मोहिते-पाटील, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शेख आणि होळकर घराण्याचे वंशज राजे भूषणसिंह होळकर यांच्या जाहीर सभा झाल्या. मात्र, पक्षाच्या प्रदेश पातळीवरून एकही स्टार प्रचारकांची सभा येथे झालेली नाही.
जिल्ह्यात एक खासदार व आ. अभिजित पाटील, आ. उत्तम जानकर, आ. नारायण पाटील व आ. राजू खरे असे चार आमदार असून, त्यांच्याकडून पक्षाच्या विजयासाठी काहीच कामगिरी दिसत नाही. वास्तविक, हे चार आमदार या उमेदवारांच्या विजयासाठी तळ ठोकून राहणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही. येथील उमेदवारांच्या विजयासाठी शहराध्यक्ष गादेकर हेच खिंड लढवत आहेत.