सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीला मात्र भोपळा मिळाला आहे. वंचितने 22 जागा लढवल्या होत्या. पक्षाला किमान 15 ते 16 जागांवर विजयाची खात्री होती, पराभवानंतर पक्षाने हा निकाल म्हणजे ईव्हीएमचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे. तसेच ईव्हीएममध्ये 20 टक्के मॅन्युअल एन्ट्री करून सेटिंग केल्याचा गंभीर आरोपही पक्षाने केला आहे.
निवडणुकीपूर्वी काँग्रेससोबतच्या युतीबाबतही सुरुवातीला युतीसाठी फारसे अनुकूल नसले तरी, नंतर सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, काँग्रेसने केवळ पाच जागांची ऑफर दिल्याने ही युती होऊ शकली नाही. काँग्रेसने वंचितला सोबत न घेतल्यामुळे त्यांनाही अपेक्षित यश मिळाले नाही. आंबेडकरी चळवळीतील विविध गट आणि पक्षांनी एकत्र येणे आता अनिवार्य झाले आहे. गटातटाच्या राजकारणामुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना मिळत आहे. भविष्यात सक्षम राजकीय पर्याय उभा करायचा असेल, तर सर्व आंबेडकरी गटांनी एकजुटीने मैदानात उतरणे हीच गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, प्रभाग एकमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दोन आणि सुजात आंबेडकर यांनी एक सभा घेऊनही मतदारांनी वंचितला नाकारले. दिग्गज नेत्यांच्या सभा होऊनही वंचितला येथे यश मिळाले नाही. वंचितला आगामी काळात यशासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.