सोलापूर : महापालिका निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघातील एकूण 36 जागांपैकी तब्बल 29 जागांवर भाजपाने विजय मिळवला. शत प्रतिशत भाजपाचा नारा देऊन आ. देवेंद्र कोठे यांनी आखलेली रणनिती यशस्वी ठरल्याचे दिसले. विधानसभेनंतर आता महापालिकेतही काँग्रेसचा गढ खालसा करुन भाजपाचा झेंडा रोवल्याचे दिसत आहे.
शहर मध्य मतदारसंघ हा तसा काँग्रेस आणि त्या अगोदर माकपाचा बालेकिल्ला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत आ. देवेंद्र कोठे यांनी काँग्रेसचा पराभव करीत पहिल्यांदा भाजपाला यश मिळवून दिले.
2017 च्या महापालिका निवडणूकीत या प्रभागात एक शिवसेना, एक माकपा, आठ काँग्रेस, पाच एमआयएम, तीन राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते तर भाजपाचे 18 नगरसेवक होते. त्यामुळे भाजपाची ताकद त्या मानाने कमी होती. परंतु यंदा आ. कोठे यांनी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आण्ाण्यासाठी शत प्रतिशन भाजपाचा नारा दिला. यामध्ये तिकीट वाटपापासून ते प्रचारापर्यंत नियोजनबध्द यंत्रणा त्यांनी राबवली.
प्रत्येक प्रभागात वैयक्तीक लक्ष दिले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वाधिक सभा आणि रॅली या मतदारसंघाता केल्या. या उलट महाविकास आघाडी म्हणून खा. प्रणिती शिंदे यांचा प्रचारातील सहभाग तेवढा दिसला नाही. आघाडीतील इतर पक्षातील नेतेही कुठे फिरकले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. दुसरीकडे एमआयएमचे प्रमुख खा. असुदुद्दीन ओवेसी यांची सभा टर्निंग पॉईंट ठरली याचा फायदा एमआयएमच्या उमेदवारांना झाला.