सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा फटका बसला असून पक्षाचा पूर्ण सुफडासाफ झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकलेला नाही, ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
यंदाच्या निवडणुकीत पक्षाकडून अनेक नवे व अननुभवी उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र त्यापैकी एकाही उमेदवाराला विजयश्री खेचता आली नाही. महापालिकेतील सक्षम नेतृत्वाचा अभाव, तसेच पक्षातील अंतर्गत पदाधिकाऱ्यांमधील तीव्र मतभेद हे या पराभवाचे प्रमुख कारण मानले जात आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीच्या ऐन तोंडावर काही उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा थेट फटका पक्षाला बसला.एकेकाळी सोलापूर महापालिकेत शिवसेनेचा बुलंद आवाज होता. यापूर्वीच्या महापालिकेत 21 नगरसेवक शिवसेनेचे होते, तसेच विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेच्याच वाट्याला आले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत हे चित्र पूर्णपणे बदलले असून, महापालिकेवर सत्ता मिळवण्याचे शिवसेनेचे स्वप्न अक्षरशः भंग पावले आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमतून उबाठा सेनेने 26 जागा लढवल्या होत्या. काँग्रेसच्या माजी महापौरांना प्रवेश देऊन निवडणूकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र त्यांचा देखिल निभाव लागला नाही त्याशिवाय शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांना पराभावाचा सामना करावा लागला आहे.
शिंदे, साठेसह चार नगरसेवक
एकनाथ शिंदे शिवसेनेचे चार नगरसेवक विजयी झाले आहे. प्रभाग सात मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अमेल शिंदे यांनी नाना काळे यांचा पराभव केला. तर प्रभाग 16 मधून एकनाथ शिंदे गटाचे प्रियदर्शन साठे विजयी झाले आहे. चार नगरसेवकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे शिवसेनेने महापालिकेत प्रवेश केला आहे.