सोलापूर : यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या कौलाने शहराच्या राजकारणात मोठा उलथापालथीचा धक्का दिला आहे. पाच माजी महापौर, दोन माजी उपमहापौर तसेच विद्यमान नगरसेवकांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अंतिम निकाल स्पष्ट होताच अनेक राजकीय समीकरणे बदलली असून, जुन्या दिग्गजांना नाकारत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे चित्र दिसून आले.
या निवडणुकीत माजी महापौर मनोहर सपाटे, संजय हेमगड्डी, अलका राठोड, आरिफ शेख तसेच यू. एन. बेरिया हे निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र अंतिम निकालात या सर्व माजी महापौरांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे सत्तास्थानी राहून शहराचा कारभार हाताळलेल्या या नेत्यांना मतदारांनी यावेळी स्पष्ट नकार दिला आहे. दरम्यान, माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मात्र विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली असून त्यांचा निकाल शेवटच्या फेऱ्यांपर्यंत चुरशीचा ठरला. दुसरीकडे दिलीप कोल्हे आणि राजेंद्र (कलंत्री) यांनाही अपेक्षित यश मिळाले नाही. या दोन्ही अनुभवी नेत्यांचादेखील दारुण पराभव झाला आहे.
याशिवाय गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी आणि मनोज शेजवाल यांनाही मतदारांचा कौल आपल्या बाजूने वळवता आला नाही. एकूणच यंदाची निवडणूक अनेक प्रस्थापित नेत्यांसाठी धक्कादायक ठरली आहे.