सोलापूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 48 जागा लढविल्या होत्या. त्यामध्ये दोन जागांचा अपवाद वगळता इतर सर्वच जागेवर त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने पक्षाचा निवडणुकीत सुफडा साफ झाला आहे.
निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रचार करुनही पक्षाचे मोठ्या प्रमाणात उमेदवार पराभूत झाले आहेत. निवडणुकीत एक ते दोन स्टार प्रचारक वगळता इतर सर्वत्र प्रचार खा. शिंदे यांनी केला होता. मात्र, त्यांचे जुने घर असलेल्या त्यांच्या विजयपूर महामार्गावरील प्रभाग क्रमांक 23 मधील महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला असून, त्यांच्याच प्रभागातील जनतेने त्यांच्या उमेदवारांना नाकारल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, विधानसभा, नगरपालिका निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याने शहर-जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची वाताहत झाल्याचे दिसत असून, यातून उभारी घेण्यासाठी खा. शिंदे, पदाधिकाऱ्यांना पुन्हा तळागाळातून काम करावे लागणार आहे.
उमेदवार दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर
देशासह राज्यात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांची टक्कर होत असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील उमेदवारांमध्ये निवडणुकीची टक्कर होत असल्याचे दिसत असून, काँग्रेसचा उमेदवार तीन ते चार नंबरवर जात असल्याचे दिसत आहे.
खा. शिंदे यांना तिसऱ्यांदा अपयश
लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर खा. प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे हातात घेऊन विधानसभा, नगरपालिका निवडणुकीचे नियोजन केले मात्र पराभव झाला. त्यातच आता महापालिकेतही काँग्रेसचा पराभव झाला असून, खा. शिंदे यांना तिसऱ्यांदा अपयश आले आहे.