सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका व एक नगरपंचायतीच्या 11 नगराध्यक्ष आणि 125 प्रभागांतून 289 नगरसेवक पदांसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणुकीचे शुक्रवारी (दि. 21) अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दिवसभरात उमेदवारी माघारी घेण्यासाठी अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज केलेल्या 114 उमेदवारांपैकी 33 उमेदवारांचे तर नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या दोन हजार 269 उमेदवारांपैकी 550 उमेदवारांचे अर्ज लढतीपूर्वीच छाननीत विविध कारणाने बाद ठरले आहेत. अनगर नगरपंचायतीचे 17 पैकी 17 जागा या बिनविरोध झाल्यातच जमा असून, अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे, तर नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता पाटील यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्याही बिनविरोध निवडीची आज घोषणा होणार आहे.
अक्कलकोट येथे आ. सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी हे रिंगणात असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दुधनी येथे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे रिंगणात असल्याने म्हेत्रे कुटूंबांसाठी ही प्रतिष्ठेची बनली आहे. अकलूज नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खा. धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलविरोधात भाजपाने पॅनेल उभा केले आहे. त्यामुळे या निवडणुकीचे राज्याचे लक्ष लागून आहे.
बार्शी, करमाळा, अकलूज, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ, कुर्डूवाडी, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर या नगरपालिका आणि अनगर या नगरपंचायतीसाठी निवडणुक प्रक्रीया सुरु आहे. 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करुन चिन्ह वाटप केले जाणार आहे. दोन डिसेंबर रोजी मतदान होऊन तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.