अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूरमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. pudhari photo
सोलापूर

Solapur Municipal Election : सोलापुरात भाजपचे एबी फॉर्म कार्यालयात वेळेत न पोहोचल्याने राडा

शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस आक्रमक, कार्यालयाबाहेर भाजप पदाधिकार्‍यांची वाट अडवत जोरदार घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

Solapur Municipal Election

सोलापूर: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूरमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. भाजपचे 'एबी' फॉर्म वेळेत न पोहोचल्याने आणि शेवटच्या क्षणी ते दाखल करण्यावरून शिंदे यांची शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची वाट अडवत जोरदार घोषणाबाजी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेवटच्‍या क्षणी आमदार कल्याणशेट्टी एबी फॉर्म घेवून आले

आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. मात्र, भाजपचे अधिकृत उमेदवार ठरवणारे 'एबी' फॉर्म वेळेत निवडणूक कार्यालयात पोहोचू शकले नाहीत. अगदी शेवटच्या क्षणी भाजप शहराध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे एबी फॉर्म घेऊन कार्यालयात दाखल झाले. यावेळी वेळ संपल्याचा दावा करत उपस्थित शिंदे सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

'दादागिरी नही चलेगी'च्या घोषणांनी परिसर दणाणला

भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना घेराव घालत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. "दादागिरी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी" अशा घोषणा देत काँग्रेस आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तीन वाजून गेल्यानंतरही फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची वाट अडवून धरली.

पोलिसांची मोठी कसरत

कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे होती. यावेळी पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT