सोलापूर ः भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा पक्षाचा ए आणि बी फॉर्म विहित वेळेत सादर करण्यावरून मोठा गोंधळ झाला. दुपारी तीन वाजता अर्ज सादर करण्यासाठी आलेल्या आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व इतर पदाधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला. सुमारे तासभर विरोधकांनी ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. काँग्रेसने याविरोधात लेखी तक्रार केली.
बंडखोरी रोखण्यासाठी भाजपने चाल खेळत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पावणे तीन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची खेळी केली. दुपारी 2.45 वाजता आ. सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि माजी अध्यक्ष नरेंद्र काळे निवडणूक कार्यालयात दाखल झाले. सात वेगवेगळ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी ए व बी फॉर्म सादर करण्यासाठी धावपळ सुरू केली. पाच अधिकाऱ्यांकडे त्यांनी फॉर्म दिले. त्यानंतर ते सर्वजण अक्षरशः निवडणूक कार्यालय क्रमांक दोनकडे धावत निघाले. त्या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, उबाठाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांच्यासह भाजप सोडून इतर पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते थांबले होते. त्यांनी एबी फॉर्म भरण्यासाठी वेळ संपला आहे. यामुळे आतून दरवाजा बंद केला आहे, असे स्पष्टपणे भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना सांगितले. त्यावर आम्ही वेळ संपण्यापूर्वीच एबी फॉर्म दिले आहेत. फक्त त्याची पेोचपावती घेण्यासाठी आलो आहोत, असे स्पष्टीकरण दिले. यावरून या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. भाजप सोडून इतर पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, ‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’, ‘क्या बडा तो देश का संविधान बडा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि परिस्थिती पाहता आंदोलनाने तीव्र रूप धारण केले. अन्याय झाल्याचा आरोप करत शिंदे गट, शिवसेना, काँग्रेस, एमयाएम तसेच अन्य पक्षांचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलनास बसले. प्रचंड घोषणाबाजी त्यामुळे वातावरण तंग झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ओंबासे आणि पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने प्रशासनाला आंदोलन शमविण्यात अपयश आले. निवडणूक कार्यालय परिसरात दीर्घकाळ तणावाचे वातावरण होते.