सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचारामुळे गेले 11 दिवस विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा, पदयात्रा, रॅली, तसेच होम टू होम प्रचाराने वातावरण ढवळून निघाले होते. आता उद्या, गुरुवार दि. 15 रोजी मतदान होणार असून, 9 लाख 24 हजार 706 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. पालिकेच्या 102 जागांसाठी तब्बल 564 उमेदवार आखाड्यात आहेत.
महापालिकेची निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात होत आहे. भाजपसमोर महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि माकपने मोठे आव्हाने उभे केले आहे. तर काही प्रभागात एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीने खुले आव्हान दिले आहे. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी , समाजवादी पार्टी, रिपाइं (ए) आणि रासप यांनी काही प्रभागात उमेदवार उभे केल्याने दुरंगी, तिरंगी लढती होत आहेत.
महापालिका प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रांची व्यवस्था, मतदारांना माहिती देण्यासाठी सुविधा, सुरक्षा यंत्रणा यासह सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 26 प्रभागांमध्ये 353 इमारतींमध्ये एक हजार 91 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या निवडणुकीत शहरातील 9 लाख 24 हजार 706 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रांच्या संख्येच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वाधिक 21 मतदान केंद्रे आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये 18 मतदान केंद्रे आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 8, 13, 22 आणि 24 या प्रभागांमध्येही तुलनेने अधिक मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 1 आणि 25 मध्ये सर्वात कमी, प्रत्येकी 9 मतदान केंद्रे ठेवण्यात आली असून, प्रभाग क्रमांक 2, 11 आणि 26 मध्येही मतदान केंद्रांची संख्या मर्यादित आहे.
3, 494 बॅलेट आणि 1, 365 कंट्रोल युनिट्स
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाने ईव्हीएम व साहित्याची व्यापक तयारी केली आहे. यामध्ये 3 हजार 494 बॅलेट युनिट्स आणि 1 हजार 365 कंट्रोल युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले असून, मतदान केंद्रांच्या गरजेनुसार 1 हजार 250 स्टेशनरी किट्स तसेच 2 हजार 500 बॅलेट युनिट कव्हर कंपार्टमेंट्सचा वापर करण्यात येणार आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण
7 निवडणूक निर्णय अधिकारी निहाय 7 ठिकाणी ईव्हीएम मशीनचे वितरण, स्ट्राँग रूम तसेच मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निप्रतिबंधक व्यवस्था व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन टप्प्यांत प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
लक्षवेधी लढती
- प्रभाग 7 मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे विरूध्द उपमहापौर नाना काळे
- प्रभाग 6 मध्ये गणेश वानकर विरूध्द मनोज शेजवाल
- प्रभाग 5 आनंद चंदनशिवे विरूध्द समाधान हावळे
- प्रभाग 15 काँग्रेसचे शहराध्यक्ष विरूध्द बाबा करगुळे
- प्रभाग 22 मध्ये किसन जाधव विरूध्द कुणाल गायकवाड
- प्रभाग 3 सुरेश पाटील विरूध्द संजय कोळी
- प्रभाग 15 माजी महापौर आरीफ शेख विरूध्द विनोद भोसले.